Update: 
वाचकांचा पत्रव्यवहार  |  ई-पेपर  |  Bookmark  |  Download Font  |  लॉग-इन

विद्यार्थ्यांच्या मदतीला 'भारूकाका'
-
Tuesday, February 21, 2012 AT 03:15 AM (IST)
Tags: hsc exam,   student,   help,   website,   mumbai

मुंबई - बारावीची परीक्षा उद्यापासून सुरू होत असून, 10 वीची परीक्षा 1 मार्चला सुरू होणार आहे. या परीक्षांच्या ताणतणावातून विद्यार्थ्यांना दिलासा व अभ्यासाची प्रेरणा देण्याच्या हेतूने "भारूकाकाची पत्रे' लिहिण्यात आली आहेत. "भारुकाका डॉट कॉम' ही 10 वी आणि 12 वीच्या विद्यार्थ्यांना ऑनलाईन मार्गदर्शन करणारी महाराष्ट्रातील पहिली व एकमेव वेबसाईट आहे.

'भारूकाका डॉट कॉम' ( www.bharukaka.com ) या संकेतस्थळावर प्रसिद्ध मानसोपचार तज्ज्ञ व लेखक डॉ. राजेंद्र बर्वे यांचे 10 वी, 12 वीच्या विद्यार्थ्यांना अभ्यासाविषयी बहुमोल मार्गदर्शन करणारे "व्हिडीओ' उपलब्ध आहेत. या संकेतस्थळावर अनुभवी व्यवस्थापन तज्ज्ञ व समुपदेशक श्रीपाद पारखे, प्रसिद्ध निवेदक प्रदीप भिडे आदींनी करिअरविषयी मार्गदर्शन केले आहे.

संजय गावकर या तरुण उद्योजकाची कथा विद्यार्थ्यांना प्रेरणादायक ठरेल. अभियांत्रिकी शिक्षण पूर्ण केल्यानंतर अचानक त्यांना दिसेनासे झाले. तरीही खचून न जाता त्यांनी निर्धारपूर्वक वाटचाल केली आणि आज ते एका कंपनीचे मालक आहेत. त्यांनी स्वानुभवाच्या आधारावर विद्यार्थ्यांना मार्गदर्शन केले आहे
"दूरदर्शन'च्या सह्याद्री वाहिनीवरील "वी-वी सावधान' या कार्यक्रमातून विद्यार्थी-पालकांना मार्गदर्शन आणि विद्यार्थ्यांच्या आत्महत्या रोखण्यासाठी जानेवारी-फेब्रुवारीत राज्यव्यापी "ध्येयशिखर' अभियान आदी उपक्रम या संकेतस्थळामार्फत राबविण्यात आले.

'डोंट क्विट' या प्रेरणादायी इंग्रजी कवितेचा स्वैरानुवाद असलेली 'ध्येयशिखर' कविता या संकेतस्थळावरून "डाऊनलोड' करता येते. या कवितेतून कठीण परिस्थितीत धीर न सोडता मार्ग काढण्याची प्रेरणा मिळते.

नापासांना धीर देण्याची गरज
दहावी-बारावी परीक्षांत अनुत्तीर्ण होणाऱ्या विद्यार्थ्यांची संख्या आजही मोठी आहे. नापासांची संख्या मार्च 2009 मध्ये साडेपाच लाख, 2010 मध्ये 7 लाख आणि 2011 मध्ये 9 लाख होती. हा आकडा 10 लाखांवर जाण्याची शक्‍यता आहे. गेल्या मार्चमधील परीक्षेत अनुत्तीर्ण झालेल्या 9 लाख विद्यार्त्यांपैकी फक्त 4 लाख जणांनी ऑक्‍टोबरमध्ये परीक्षा दिली. बाकीच्या 5 लाख विद्यार्थ्यांचे काय झाले, हा गंभीर प्रश्न आहे. ऑक्‍टोबरमध्ये परीक्षेला बसलेल्यांपैकी 78 हजार विद्यार्थीच "पास' झाले; बाकीच्या 3 लाख 32 हजार विद्यार्थ्यांवर पुन्हा अपयशाचा शिक्का बसला. ही परिस्थिती विदारक आहे. या विद्यार्थ्यांना पुन्हा शिक्षणाच्या प्रवाहात आणण्यासाठी योग्य मार्गदर्शन आणि आत्मविश्वास जागवणे महत्त्वाचे आहे. या हेतूनेच "भारूकाका डॉट कॉम' संकेतस्थळ सुरू करण्यात आले आहे. त्याबाबत अधिक माहितीसाठी संपर्क - महेंद्र बैसाणे (9321550286).


आजचा सकाळ...
Advertise With Us | About Us | Contact Us | RSS Feeds | Archives | Group Site | SakaalTimes | Subscribe | एग्रोवन | साप्ताहिक सकाळ | Work with Us
© Copyrights 2011 eSakal.com - All rights reserved.
of
Powered By: